नवी दिल्ली – लडाखमध्ये भारत आणि चीनचे सैनिक आमने-सामने ठाकणे हे मोठे आकाराला आलेले संकट आहे. मात्र, कुटनीती आणि निर्णायक नेतृत्वामधून सरकारची कृती भारताच्या प्रादेशिक अखंडतेचे संरक्षण करेल, असा विश्वास काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी व्यक्त केला.
काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची (सीडब्ल्यूसी) बैठक पार पडली. ही समिती काँग्रेसचे सर्व महत्त्वाचे निर्णय घेते. या समितीमध्ये मंगळवारी भारताचे चीन आणि नेपाळबरोबर ताणलेल्या संबंधांची चर्चा करण्यात आली. या समितीच्या बैठकीत चीनच्या सैनिकांबरोबर झटापटीत वीरमरण आलेल्या 20 जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. काँग्रसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटमध्ये ही माहिती दिली.
सोनिया गांधी समितीच्या बैठीकमध्ये म्हणाल्या, की प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनबरोबर असलेले संकट मोठ्या प्रमाणात वाढले आहे. भविष्याबाबत माहिती नाही. गरिबांच्या हातात थेट पैसे तातडीने देण्याची गरज आहे. त्याचबरोबर एमएसएमईचे संरक्षण आणि त्यांचा विकास वाढण्यासाठी सरकारने मदत करावी, अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केली.
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजवरही त्यांनी टीका केली. त्या म्हणाल्या की, सरकारने पोकळ वित्तीय पॅकेज जाहीर केले आहे. त्यामध्ये जीडीपीच्या एक टक्क्यांहून कमी तरतूद आहे. गेली सतरा दिवस पेट्रोल व डिझेलचे दर वाढत असल्यावरूनही त्यांनी सरकावर टीका केली. जागतिक बाजारात खनिजाचे दर कमी होत असताना निर्दयीपणे सरकार सलग 17 दिवस पेट्रोल व डिझेलचे दर वाढवित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात सर्व केंद्रीय यंत्रणा हातात आहे. तरीही महामारीचे प्रमाण वाढत आहे. केंद्र सरकारने राज्यांना शून्य अतिरिक्त आर्थिक मदत केल्याची टीका सोनिया गांधींनी केली.
गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलाविली होती. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेनजीकची घटना पक्षासाठी चांगली नाही. नेपाळबरोबर असलेले संबंध हे आजपर्यंत सर्वाधिक खालावलेले आहेत, असे काँग्रेसमधील सूत्राने म्हटले आहे.