नवी दिल्ली - भारतात रिलायन्स कंपनीची जिओ सेवा उपलब्ध झाल्यानंतर इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या एका अहवालानुसार, जगात इंटरनेट वापरकर्त्यांत भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. मेरी मीकर यांच्या इंटरनेटच्या वापरावर आलेल्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.
अहवालानुसार, जगात एकूण ३ अब्ज ८० लाख इंटरनेट वापरकर्ते आहेत. ही संख्या जगातील लोकसंख्येपैकी अर्धी आहे. यामध्ये २१ टक्क्यांसह चीन जगात पहिल्या क्रमांकावर आहे. १२ टक्के इंटरनेट वापरकर्त्यांसह भारत दुसऱयास्थानी आहे. तर, अमेरिकेत ८ टक्के इंटरनेट वापरकर्ते आहेत.
जगभरात इंटरनेट वापरकर्त्यांच्या संख्येत वाढ होत आहे. २०१८ साली ६ टक्के वृद्धी झाली. परंतु, २०१७ साली झालेल्या ७ टक्यांच्या तुलनेत यामध्ये घट दिसून आली आहे. ५ सप्टेंबर २०१६ साली जिओने भारतीय इंटरनेट क्षेत्रात पाऊल टाकले होते. स्वस्त सेवेमुळे इंटरनेट ग्राहकांत कमालीची वाढ पाहायला मिळाली होती. यामुळे जिओच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांनाही दर कमी करावे लागले होते. सध्या जिओ अग्रेसर असून भारतात जिओचे ३० कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत.