नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्यामध्ये आज एक व्हर्चुअल परिषद पार पडली. यावेळी त्यांनी संयुक्तपणे भारत आणि बांगलादेशमधील चिलाहाटी-हल्दीबारी या रेल्वेमार्गाचे उद्घाटन केले. यासोबतच त्यांनी यावेळी बांगलाबंधू-बापू या डिजिटल प्रदर्शनाचंही उद्घाटन केले.
दोन्ही देशांमध्ये सात करार..
भारत आणि बांगलादेशमधील संबंध अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने आज महत्त्वाचे पाऊल उचलले गेले. दोन्ही देशांच्या दरम्यान आज सात करार झाले. हायड्रोकार्बन, शेती आणि कापड उद्योग अशा विविध क्षेत्रांमधील सात करारांवर आज स्वाक्षरी झाली.
बांगलाबंधू-बापू डिजिटल प्रदर्शनाचे उद्घाटन..
यावेळी मोदी आणि हसीना यांनी बांगलादेशचे संस्थापक मुजिबूर रहमान आणि महात्मा गांधी यांच्या सन्मानार्थ भरवण्यात आलेल्या एका डिजिटल प्रदर्शनाचेही उद्घाटन केले. बांगलाबंधू-बापू असे या प्रदर्शनाचे नाव होते.
चिलाहाटी-हल्दीबारी रेल्वेमार्ग पूर्ववत..
१९६५ पर्यंत कार्यरत असणारा, आणि नंतर बंद झालेला चिलाहाटी-हल्दीबारी रेल्वेमार्ग आज पुन्हा सुरू करण्यात आला. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांनी या मार्गाचे उद्घाटन केले. कोलकाता आणि सिलिगुरीला जोडणारा हा महत्त्वाचा रेल्वेमार्ग होता. यावरील सेवा आता पूर्ववत झाल्यमुळे दोन्ही देशांमधील संबंध अधिक चांगले होण्याची शक्यता आहे.
भारताच्या शेजारधर्माचा बांगलादेश साक्षीदार..
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की भारताचा शेजारधर्म किती चांगला आहे याचा बांगलादेश साक्षीदार आहे. त्यामुळे या दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याला आपण प्राधान्य देत आलो आहोत. भारताचा विजय दिन तुमच्यासोबत साजरा करताना आम्हाला आनंद होतो आहे. कोरोना काळातही बांगलादेश आणि भारतामध्ये उत्तम प्रकारे परस्पर सहकार्य राहिले होते असे मोदी म्हणाले.
भारत हा बांगलादेशचा खरा मित्र..
यावेळी बोलताना शेख हसीना यांनी भारताचा उल्लेख हा बांगलादेशचा खरा मित्र असा केला. निर्मितीपासून भारत आणि बांगलादेशचे संबंध अधिकाधिक बळकट होत आहेत. मार्चमध्ये होणारा पंतप्रधान मोदींचा ढाका दौरा हा आमच्या स्वातंत्र्य युद्धाच्या स्मारकाचा गौरव वाढवेल, असेही त्या म्हणाल्या.