रुर्की - आयआयटीच्या शास्त्रज्ञांनी पोर्टेबल व्हेंटिलेटर विकसित केला आहे. हा कोरोना विषाणू संक्रमित रुग्णांसाठी उपयुक्त ठरू शकतो. व्हेंटिलेटर आणि इतर वैद्यकीय उपकरणांची तीव्र कमतरता असेल अशावेळी रुग्णांसाठी हा व्हेंटिलेटर वापरता येऊ शकतो. या व्हेटिलेटरला 'प्राणवायू' हे नाव देण्यात आले असून एआयआयएमएस ऋषिकेश यांच्या सहकार्याने हे विकसित करण्यात आले आहे.
पोर्टेबल व्हेंटिलेटरचे वैशिष्ट्य -
या प्रो-टोटाईप व्हेंटिलेटरची चाचणी यशस्वीपणे केली आहे. हा व्हेंटिलेटर श्वास घेण्यास त्रास असणाऱ्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे. हा व्हेंटिलेटर सामान्य वार्डमध्ये आणि मोकळ्या जागेतसुद्धा काम करू शकतो. हा रियलटाईम आणि स्पिरोमेट्री या सोईनी सज्ज असल्यामुळे सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे.
लॉकडाउन कालावधीत व्हेंटिलेटरच्या संशोधन आणि विकासाचे काम सुरू केले होते. आयआयटीच्या प्रयोगशाळेच्या सुविधांचा वापर करण्यात आला आहे. मायक्रोप्रोसेसर, नॉन-रिटर्न झडप, सोलेनाइड वाल्व्ह सारख्या अनेक भागांचा वापर करून बनवला आहे. हा व्हेंटिलेटर खास कोविड-19 या विषाणूचे देशातील आव्हान पेलण्यासाठी बनवला गेला आहे.
हा व्हेंटिलेटर सुरक्षित आणि कमी खर्चात तयार केले जाणारे मॉडेल असून कमी वेळात तयार केला जाऊ शकतो. संशोधन आणि विकास विभाग आयआयटीचे प्रोफेसर अक्षय द्विवेदी, अरुप कुमार यांचा हा व्हेंटिलेटर बनवण्यात सहभाग होता. त्यांना एम्स ऋषिकेशचे डॉक्टर देवेंद्र त्रिपाठी यांनी सहकार्य केले.