कानपूर- आयआयटी कानपूरने चांद्रयान-2 मधील दोन उपप्रणालींसाठी मॅप जनरेशन आणि मोशन प्लॅनिंग हे अल्गोरिदम विकसित केले आहेत. आयआयटीचे प्राध्यापक आशिष दत्त यांनी सांगितले की, चांद्रयान-२ मध्ये बऱ्याच उपप्रणाली आहेत. मात्र, चांद्रयान-2 मधील मॅप जनरेशन आणि मोशन प्लॅनिंग या उपप्रणालींसाठी ईस्रो, विक्रम साराभाई अवकाश संशोधन केंद्र, त्रिवेन्द्रम आणि आयआयटी कानपूर यांच्यात एक सांमजस्य करार झाला होता.
आशिष दत्त पुढे म्हणाले की, हा करार प्रामुख्याने सॉफ्टवेअर आणि अल्गोरिदम विकासासाठी करण्यासाठी करण्यात आला होता. ईस्रोच्या सुचनेनुसार हे प्रोटोटाईप रोव्हर बनवण्यात आले आहे. चांद्रयान-2 मध्ये 'विक्रम' आणि 'प्रज्ञान' नावाचे दोन लँडर आहेत. या रोव्हरला सहा चाके आहेत आणि ते खडकावर सहज चढू शकते. ही चाके डीसी मोटारवर चालतात आणि अशा दोन डीसी मोटार प्रत्येक चाकात आहेत. तसेच हे रोव्हर सौर उर्जेवर चालु शकते. अशी माहिती दत्त यांनी दिली. तसेच हे अल्गोरिदम विकसित करण्यासाठी प्राध्यापकांच्या नेतृत्वाखाली 10 विद्यार्थ्यांना तीन वर्ष लागल्याचेही त्यांनी सांगितले.
भारताच्या मिशन चांद्रयान-२ मोहिमेला सुरू होण्यास आता काही तासांचा वेळ राहिला आहे. १४ जुलैला मध्यरात्री २ वाजून ५१ मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-३ च्या मदतीने चांद्रयान-२ अवकाशात उड्डाण घेणार आहे. लॉन्चिंग नंतर ५४ दिवसाने चांद्रयान-२ चंद्रावर पोहोचेल. यासंबंधी चांद्रयान-२ मोहिमेची तयारी कशाप्रकारे करण्यात आली. याचा व्हिडिओ इस्रोकडून प्रदर्शित करण्यात आला.
सन २००८ मध्ये पाठवलेल्या चांद्रयान-१ मध्ये चंद्राच्या कक्षेत फिरणारे ऑरबिट लावण्यात आले होते. पण, चंद्राच्या पृष्ठभागावर फिरुन संशोधन करणारे रोव्हर त्यावेळी त्यात नव्हते. यावेळी मात्र या यानाचे रोव्हर चंद्रावर उतरणार आहे. आता चांद्रयान-२ मोहिमेमधले रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल तेव्हा चंद्राची आणखी रहस्ये उलगडता येणार आहेत. चंद्राच्या कक्षेत प्रवेश झाल्यावर त्याचे ऑर्बिटर, लँडरपासून वेगळे होणार आहे. त्यानंतर लँडर १५ मिनिटांमध्ये चंद्राच्या जमिनीवर उतरेल आणि रोव्हर वेगळा होईल. ऑर्बिटरमध्ये अनेक संवेदनशील उपकरणे, कॅमेरे आणि सेंसर्स असणार आहेत. अशाचप्रकारे रोव्हर देखील अत्याधुनिक उपकरणांनी युक्त असेल. ऑर्बिटर आणि रोव्हर चंद्राच्या पृष्ठभूमीवरील खनिजे आणि इतर संबंधिची माहिती पाठवण्याचे काम करतील.