नवी दिल्ली - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्लीला मध्य आशियामधील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. स्कायट्रॅक्स वर्ल्ड एअरपोर्ट अवार्ड २०२० सलग दुसऱ्या वर्षीही दिल्ली विमानतळाला मिळाला आहे.
विमानतळाचे सीईओ विदेह जयपुरियार यांनी या यशाचे श्रेय विमानतळावरील एजेंसीच्या कर्मचाऱ्यांना दिले. तसेच विमानतळाची योग्यरित्या देखरेख करण्यासाठी हे कर्मचारी सदैव तत्पर असतात. हे कर्मचारी नेहमी ग्राहकांना चांगली सेवा देत असतात, असे जयपुरियार म्हणाले. याशिवाय त्यांनी स्कायट्रॅक्सचे देखील आभार मानले आणि सन्मानित करण्यात आलेल्या इतर विमानतळांना देखील शुभेच्छा दिल्या.
जगातील पहिल्या ५० विमानतळांच्या यादीत समावेश -
दिल्ली विमानतळाने गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही विमानतळाची देखरेख, तसेच ग्राहकांना सेवा देणे यासारखे काम अतिशय चांगल्यारितीने पार पाडले आहे. त्यामुळे या विमानतळाला मध्य आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून घोषित करण्यात आले, असे स्कायट्रॅक्सचे सीईओ एडवर्ड प्लायड यांनी सांगितले. याप्रकारे दिल्ली विमानतळ मध्य आशियातील सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून समोर आले आहे. या विमानतळाने जगातील पहिल्या ५० विमानतळांच्या यादीत देखील स्थान पटकावले आहे.
जगात सातव्या तर मध्य आशियातील पहिल्या स्थानावर -
दिल्ली विमानतळाने वर्षभरातील ६० ते ७० मिलियन प्रवाशांची योग्यरित्या वाहतूक केली. त्यामुळे स्कॉयट्रॅक्सने या विमानतळाला जगात सातव्या क्रमांकाचे स्थान दिले आहे, तर मध्य आशियामध्ये पहिल्या स्थानावर आहे.