श्रीनगर - जम्मू काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी रचलेला घातपाताचा कट जवानांनी उधळला आहे. भारतीय सुरक्षा दलाच्या सतर्कतेमुळे भुसुरूंग स्फोटाची घटना टळली आहे. सुरक्षा दलाच्या जवानांनी काही स्फोटके जप्त केली आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी तुजन गावातील एक पुलाखाली हो स्फोटके पेरली होती. याबाबतीत सुरक्षा दलाच्या जवानांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन, ती स्फोटके निकामी करून जप्त केली आहेत. दहशतवादी सध्या रस्ते आणि महामार्गावर अशाप्रकारे स्फोटके पेरून ठेवत आहे, ज्याद्वारे महामार्गावरून जाणाऱ्या काश्मीरमधील सुरक्षा दलाच्या वाहनांना लक्ष्य केले जाईल. या घटनेनंतर परिसरातील सुरक्षा चोख करण्यात आली आहे. तसेच या भागातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. नागरिकांसाठीही परिसरात प्रवेश निषिद्ध करण्यात आला आहे.
अशा प्रकारच्या लष्कराच्या विरोधात केल्या जाणाऱ्या कारवाया टाळण्यासाठी सुरक्षा दलाचे स्वतंत्र पथक काम करते. यामध्ये श्वान पथक आणि काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे आहेत, ज्या माध्यमातून हे पथक सुरुवातीला महामार्ग तपासून घेते, आणि भूसुरूंग यासारख्या घटना टळते. रस्ता पूर्ण सुरक्षित असल्याची खात्री झाल्यावरच जवानांच्या वाहनांचा ताफा पुढे मार्गस्थ होतो. रोड ओपनिंग पार्टी म्हणून या दलास ओळखले जाते.
यापूर्वी ही बारामुल्ला जिल्ह्यातील पट्टन येथे अशा प्रकारची स्फोटके सुरक्षा दलांनी शोधून नष्ट केली होती. २९ राष्ट्रीय रायफल दलाच्या तुकडीने ही कारवाई केली होती.