इडूक्की (कोची) - केरळमधील इडुक्की जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनामधील मृतांची संख्या 53 वर पोहोचली आहे. अजूनही येथील ढिगार्यातून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. भूस्खलनामुळे येथील चहा-मळे कामगारांची घरे जमीनदोस्त झाली आहे.
राजमलाजवळील पेट्टीमुडी येथे झालेल्या भूस्खलनामुळे जमीनदोस्त झालेल्या घरांच्या ढिगार्यातून तीन दिवसांनंतरही मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत. आता यासाठी कुत्र्यांची मदत घेणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. या भागात 78 लोक राहत होते, असे सरकारने सांगितले आहे. यापैकी 12 जणांना वाचवण्यात यश आले आहे. उरलेल्यांनाही शोधण्याचे प्रयत्न अथकपणे सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मदत शिबिरातही वेगवेगळे भाग करून तेथे लोकांना ठेवले आहे. एर्नाकुलम जिल्ह्यात 1 हजार 203 पूरग्रस्तांना मदत शिबिरात हलवण्यात आले आहे. सर्वसाधारण मदत शिबिरात 1 हजार 118 लोकांना ठेवण्यात आले आहे, तर 67 ज्येष्ठ नागरिकांना 60 वर्षांवरील लोकांसाठी असलेल्या शिबिरात ठेवले आहे. बाहेरगावाहून आलेल्या 18 लोकांना विलगीकरण कक्ष तयार करून तेथे ठेवले आहे.
मुसळधार पावसामुळे केरळच्या काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. 6 ऑगस्टला गुरुवारी इडुक्की जिल्ह्यातील पर्यायी पूलही मुसळधार पावसामुळे कोसळला होता. इतकेच नव्हे, तर मुथिरापूजा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने प्रसिद्ध पर्यटन स्थळ मुन्नारसारख्या सखल भागातही पूर आला.