नवी दिल्ली : आयसीएमआरच्या वैज्ञानिकांनी देशामध्ये कॅट क्यू व्हायरस (सीक्यूव्ही) अस्तित्वात असल्याची माहीती दिली आहे. चीनमधील हा विषाणू आता आपल्या देशातील नागरिकांमध्येही पसरू शकतो, अशी शक्यता आयसीएमआरच्या वैज्ञानिकांनी वर्तवली आहे. या विषाणूमुळे ताप येणे, मेंदूज्वर आणि लहान मुलांच्या मेंदूला सूज येणे असे आजार होऊ शकतात.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमधील सात वैज्ञानिकांनी याबाबत माहिती दिली आहे. क्यूलेक्स जातीच्या डासांमध्ये आणि काही डुकरांमध्येही हा विषाणू आढळून आला आहे. देशात क्यूलेक्स प्रजातींच्या डासांप्रमाणेच इतर काही प्रजातींचे डास असल्यामुळे, या विषाणूचा प्रसार कसा होतो आहे याबाबत हे वैज्ञानिक सध्या संशोधन करत आहेत. चीन आणि व्हिएतनाममध्ये क्युलेक्स डासांमार्फतच या विषाणूचा प्रसार झाल्यामुळे आशियातील इतर देशांमध्येही तो होण्याची शक्यता अधिक असल्याचे या वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
शास्त्रज्ञांना दिल्लीतील ८८३ लोकांच्या सेरम नमुन्यांपैकी दोघांमध्ये या विषाणूची प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) तयार झालेली दिसून आली. म्हणजेच, त्यांना या विषाणूची लागण होऊन गेली होती. मात्र या संशोधनादरम्यान एकाही व्यक्तीमध्ये हा विषाणू आढळला नाही.
भारतात या विषाणूचा प्रसार डासांमार्फत होण्याची शक्यता अधिक असल्याचे एका वैज्ञानिकाने म्हटले आहे.
हेही वाचा : ७० हजार नव्या रुग्णांसह देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ६१ लाखांवर!