विशाखापट्टणम (आ.प्र) - देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालाली आहे. या विषाणूला अटकाव करण्यासाठी आरोग्य यंत्रणा, सुरक्षा कर्मचारी जिवाची पर्वा न करता काम करत आहेत. या वेळी कर्मचाऱ्यांनी स्वकियांना सोडून कर्तव्याला प्राधान्य दिल्याचे दिसून आले आहे. असाच एक प्रत्यय विशाखापट्टणम येथे आला आहे. ६ महिन्यांची प्रसुती रजा सोडून एक महिला भारतीय प्रशासकीय अधिकारी नोकरीवर रुजू झाली आहे.
स्रिजाना गुम्माल्ला असे या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांचे नाव आहे. २०१३ मध्ये प्रशासकीय सेवेत दाखल झालेल्या स्रिजाना या सध्या विशाखापट्टणम महापालिकेच्या आयुक्त आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी एका मुलाला जन्म दिला होता. त्यानंतर, स्रिजाना यांनी आराम करण्याचे अपेक्षित होते. यासाठी ६ महिन्याची प्रसुती रजा देखील देण्यात आली आहे. मात्र, कोरोना संकटकाळी प्रशासनाला आपली जरूरत असल्याची भावना बाळगत स्रिजाना या नोकरीवर रुजू झाल्या आहेत. विशेष म्हणजे, स्रिजाना या आपल्या मुलाला सोबत घेऊन आपल्या दालनात काम करत आहेत.
हा माझा वैयक्तिक निर्णय आहे, नोकरीवर येण्यासाठी कोणी मला दडपण आणलेले नाही. माझ्या पतीशी आणि कुटुंबाशी बोलल्यानंतरच मी नोकरीवर रुजू झाले आहे. मी नोकरीवर असताना माझ्या मुलाची काळजी माझ्या कुटुंबाकडून घेतली जाते, त्यामुळे मी त्यांचे आभारी आहे. मुलाची काळजी घेण्याएवजी सुट्टी सोडून कामावर येण्याबाबत मी कधी विचारही केला नव्हता, मात्र परिस्थिती खूप बिकट आहे आणि अशा वेळेस मी कामावर असताना त्याचा एका व्यक्तीला जरी फायदा होत असेल तर ते माझ्यासाठी उपयुक्त ठरेल, असे मत स्रिजाना यांनी व्यक्त केले आहे.
हेही वाचा- ओडिशामध्ये 'ओला' करणार अत्यावश्यक वाहतूक; रुग्णांसह डॉक्टर अन् वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही फायदा..