पाटणा - देशातील युवक बेरोजगार आहे. या ५६ इंचाच्या छाती वाल्यांनी युवकाना रोजगार देण्याचे वचन दिले होते. मात्र, त्यांनी ५ वर्षापर्यंत फ्लॉप सिनेमा चालवला, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज ते बिहारच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान आपल्या जनभावना रॅलीला संबोधित करताना त्यांनी केंद्रातील भाजप सरकारला फैलावर घेतले.
पंतप्रधान मोदी यांनी युवकांना २ कोटी नोकऱ्या देण्याचे वचन दिले होते. ते बिहारमध्ये येतील तेव्हा त्यांना विचारा तुम्ही आमच्याशी खोटे का बोलले? शेतकऱ्यांना योग्य किंमत देण्याचे वचनही दिले होते. त्यावरूनही तुम्ही खोटे का बोललात? प्रत्येकांच्या खात्यामध्ये १५ लाख रुपये देण्याचे वचन दिले. यावरूनही तुम्ही खोटे का बोलले? असेही राहुल यावेळी म्हणाले.
तुमच्या डोळ्यांसमोर चोरी झाली आणि तुम्ही पाहत होते. तुम्ही केव्हापर्यंत शांत बसून राहणार? असा सवालही त्यांनी उपस्थितांसमोर केला. तसेच नरेंद्र मोदी चौकीदार आहे. त्यांनी चोरी केली आहे. चौकीदार हे मोठ्या लोकांच्या घरी असतात आणि मोदी अंबानीच्या घरी चौकीदारी करतात, असा टोला त्यांनी मोदींवर मारला.
मोदी म्हणतात मी शेतकऱ्यांना मदत करणार. मात्र, खरे पाहता त्यांनी बड्या उद्योगपतींना ३ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज दिले आहे. आम्ही सत्तेत आलो तर मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड सारखे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार, असे वचनही त्यांनी यावेळी दिले. मी नरेंद्र मोदी, भाजप आणि आरएसएसला घाबरत नाही. मी केवळ सत्याचा पक्षधर आहे, असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले.