नवी दिल्ली : शीख फॉर जस्टिस (एसएफजे) या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेने लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकवणाऱ्यावर बक्षीस जाहीर केले आहे. १५ ऑगस्टला हे काम करणाऱ्या व्यक्तीला एक लाख २५ हजार डॉलर्सचे बक्षीस देण्याची घोषणा या संघटनेने केली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व सुरक्षा व्यवस्थांना अलर्ट करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस राजधानीमधील सुरक्षा व्यवस्थेची तयारी करत आहेत. स्वातंत्र्यदिनादिवशी दिल्लीमध्ये ४५,००० सुरक्षा अधिकारी तैनात असणार आहेत. तसेच, लाल किल्ल्याभोवती पाच किलोमीटरच्या परिघात असणाऱ्या उंच इमारतींवर दोन हजार स्नायपरही तैनात असणार आहेत.
एसएफजेचा जनरल काऊंसिल गुरपतवंत सिंग पन्नून याने सोशल मीडियावर एक संदेश प्रसारित केला होता. १५ ऑगस्ट हा शीखांसाठी स्वातंत्र्यदिन नाही. भारताचे संविधान हे शीखांना हिंदू मानते. १५ ऑगस्टला जो कोणी लाल किल्ल्यावर खलिस्तानचा झेंडा फडकावेल त्याला १ लाख २५ हजार डॉलर्सचे बक्षीस देण्यात येणार आहे असे या संदेशात म्हटले आहे. तसेच यात १९८४च्या दंगलींचाही उल्लेख करण्यात आला आहे.
सुरक्षा व्यवस्थांनी असे स्पष्ट केले आहे, की हा केवळ नागरिकांमध्ये भीती पसरवण्याच्या प्रयत्न आहे. यासंबंधी चौकशी सुरू करण्यात आली असून, कोणत्याही संशयित व्यक्तीला तातडीने ताब्यात घेण्यात येत आहे. स्वातंत्र्यदिनादिवशी सुरक्षा व्यवस्था तोडून लाल किल्ल्यावर जाणे अशक्य असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.