हैदराबाद - हैदराबादच्या कुलसुमपुरा येथील पोलीस कॉन्स्टेबलचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोना वैद्यकीय चाचण्या घेण्यात सरकारी डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे.
कॉन्स्टेबलला सुरुवातीला ताप आला होता. ताप आल्याने रुग्णालयात तो तपासणीसाठी गेला. मात्र, डॉक्टरांनी त्याची कोरोना चाचणी घेण्यास नकार दिला आणि घरी पाठवले. एका आठवड्यानंतर पुन्हा आजारी पडल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा चाचणी केल्यावर तो कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. मात्र, दोन दिवस उपचार घेतल्यानंतर कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला.
कोरोनासंबंधी वैद्यकीय चाचण्या घेण्यात सरकारी डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा दावा मृताच्या भावाने केला आहे. चाचणी करून जर वेळेवर औषधोपचार दिले असते, तर माझा भाऊ जिवंत असता, असे मृताचा भाऊ म्हणाला. आज सकाळी पोलीस अधिकाऱयांनी कॉन्स्टेबलच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले.