हैदराबाद - कोरोनावर मात करण्यासाठी भारतामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे स्थंलातरित कामगारांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पोलिसांनी सध्याच्या परिस्थितीच खाकीतील माणुसकी दाखविली आहे. हैदराबादमधील एका पोलीस अधिकाऱ्याने लॉकडाऊनमुळे अडकलेल्या हिमाचल प्रदेशातील एका व्यक्तीच्या आपत्कालीन शस्त्रक्रियेसाठी २० हजार रुपये दिले आहेत.
बी. एल. लक्ष्मीनारायण रेड्डी असे पोलीस अधिकाऱ्यांचे नाव आहे. सायबराबाद पोलीस आयुक्तालयांतर्गत कुकटपल्ली पोलीस ठाण्यामध्ये ते कार्यरत आहेत. हिमाचल प्रदेशच्या हमीरपूर जिल्ह्यातील रहिवासी ललित कुमार लॉकडाऊनमुळे हैदराबादमध्ये अ़डकले होते. वैद्यकीय शस्त्रक्रियेची गरज असल्याने त्यांनी पोलिसांकडे मदत मागितली. यावर लक्ष्मीनारायण रेड्डी यांनी कुमार यांना शहरातील ओमनी रुग्णालयात दाखल केले. तसेच रुग्णालयाचे शुल्कही त्यांनीच चुकते केले.
हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय आणि मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी लक्ष्मीनारायण यांचे कौतुक केले. तसेच तेलंगणाचे पोलीस महासंचालक एम. महेंद्र रेड्डी यांनीही टि्वट करत लक्ष्मीनारायण यांचे कौतुक केले.