हैदराबाद - गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पांड्या यांच्या हत्येप्रकरणी तुरुंगवास झालेले मौलवी मौलाना मोहम्मद नसुरुद्दीन यांचे आज (शनिवार) निधन झाले. या प्रकरणातून त्यांची निर्दोष सुटकाही झाली होती. दिर्घ आजाराने त्यांचे 75 व्या वर्षी निधन झाले. गुजरात दंगलीचा बदला घेण्यासाठी कट रचल्याच्या आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
मौलाना मोहम्मद तेहरीक- ए- वहादात- ए- इस्लामी या संघटनेचे नेतेही होते. हैदराबादमधील सईदाबाद येथे त्यांचे निधन झाले. मौलवींच्या निधनानंतर पोलिसांनी परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. ईदगाह उजाले शहा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मुस्लिम युवकांना कट्टरतावादी बनवत असल्याचा त्यांच्यावर कायम आरोप ठेवण्यात येत होता. त्यामुळे पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांची त्यांच्यावर कायम नजर असे. मौलाना मोहम्मद यांना एप्रिल 2004 साली गुजरात पोलिसांनी अटक केली होती. पांड्या यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.
गुजरातचे माजी गृहमंत्री हरेन पांड्या यांची 26 मार्च 2003 ला अहमदाबादेत हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांना हत्या करण्यात प्रवृत्त केल्याचा आरोप मौलवींवर ठेवण्यात आला होता. तसेच नंतर हत्येचा कट रचल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. सहा वर्ष तुरुंगात घालवल्यानंतर त्यांची पोटा न्यायालयाने 2010 साली निर्दोष सुटका केली होती. मात्र, सुटकेनंतरही पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांचे त्यांच्यावर लक्ष असे.
गुजरात दंगलीचा बदला घेण्यासाठी कट आखल्याचा आरोप
ओसामा बिन लादेनचा 2011 साली अमेरिकेने खात्मा केल्यानंतर आणि संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरुला फाशी दिल्यानंतर मौलवी मोहम्मद यांनी प्रार्थना सभा भरवली होती. तसेच गुजरात दंगलीचा बदला घेण्यासाठी कट रचल्याच्या आरोपवरूनही मौलवींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.