महोबा - उत्तरप्रदेशमधील महोबा येथे पावसाने हजेरी लावली. जवळपास अर्धा तास पडलेल्या पावसात येथील रुग्णालयात पाणी शिरले. आश्चर्याची बाब म्हणजे रुग्णालयात साचलेले पावसाचे पाणी काढण्यासाठी प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नाही.
रुग्णालयाच्या आतील भागात पावसाचे पाणी शिरल्यामुळे काम करणे अवघड झाले होते. पाण्याची पातळी गुडघ्यापर्यंत वाढल्याने रुग्णालयात कोणत्याही रुग्णावर उपचार करणे डॉक्टरांसाठी आव्हानात्मक बनले होते. रुग्णालयातील आपत्कालीन विभागातही पावसाचे घाण पाणी साचले होते. त्यामुळे रुग्णालयातील कर्मचारी स्ट्रेचर, बेड आणि टेबलावर बसून होते. यावेळी रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना नाराजी दर्शवली.
रुग्णालयात गुडघ्यापर्यंत पाणी शिरुनदेखील कर्मचाऱ्यांनी रुग्णांना शक्य होईल तेवढी सेवा देण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयातील अधिकारी परिस्थितीबाबत बोलताना म्हणाला, पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी रुग्णालयात कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही.