राजौरी - कोरोनाने संपूर्ण जगभरात थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेकांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. अशात आता एक आर्श्चयकारक घटना समोर आली आहे. शोपियन येथून राजौरीमध्ये आलेल्या एका घोड्यालाही क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर घोड्याच्या मालकाला प्रशासकीय क्वारंटाईन केले गेले आहे.
तहसीलदार अंजूम खान यांनी सांगितले, की घोडा आणि त्याचा मालक शोपियन या रेड झोनमधून आले होते. त्यामुळे आम्ही त्यांना क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला. संबंधित व्यक्तीला प्रशासकीय क्वारंटाईन करण्यात आले. मात्र, घोड्याला कोठे क्वारंटाईन करायचे, हा सवाल आमच्यासमोर होता. यानंतर आम्ही घोड्याच्या मालकाचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहेत. मालकाचा अहवाल येईपर्यंत घोड्याला क्वारंटाईन ठेवले जाणार असल्याचे खान यांनी सांगितले.
आम्ही त्या कुटुंबालाही याबाबत सूचना दिल्या असून घोड्याला माणसांपासून दूर ठेवण्याचा सल्ला दिला आहे. सोबतच घरातील इतर पाळीव प्राण्यांपासूनही या घोड्याला दूर ठेवण्यास सांगितल्याचेही खान म्हणाले.
ठाणा मंडीच्या पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकीय सहाय्यक शल्यचिकित्सक डॉ. इम्तियाज अंजुम यांनी माध्यमांना सांगितले की, घोड्यामुळे आपल्यालाही कोरोना होईल, अशी भीती काही जणांना वाटत आहे. पण घोड्याला जरी कोरोना झाला तरी तो इक्यूइन कोरोना व्हायरस असेल. हा कोरोना व्हायरस कोविड १९ पेक्षा वेगळा असतो.
सध्या घोड्यामध्ये अशी कोणतीही लक्षणे नाहीत. मालक पॉझिटिव्ह आला तर घोड्याला कोरोनाची लागण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सोबतच घोड्याला सध्या औषधे देत असल्याचेही अंजुम यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमध्ये आतापर्यंत 1 हजार 759 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 833 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.