नवी दिल्ली - कुटुंबीयाच्या विरोधात जाऊन लग्न केल्यामुळे पोटच्या मुलीची गोळी झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीत घडली आहे. नोएडा येथील दस्तमपूर येथे ही घटना घडली. निशा पुत्री असे मृत तरुणीचे नाव आहे.
निशाने धनसिया येथील सुनील कुमार याच्याशी २०१८ मध्ये जून महिन्यात कोर्ट मॅरेज केले होते. त्याचा राग तिच्या कुटुंबीयांच्या मनात धगधगत होता. समाजातील आपल्या खोट्या प्रतिष्ठेसाठी तिच्या कुटुंबीयांनी तिची हत्या केल्याचा आरोप निशाचे पती सुनील यांनी केला आहे. तिच्या कुटुंबीयांविरोधात जेवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
निशा आणि सुनीलने जेव्हा लग्न केले होते, तेव्हा ते दोघेही अल्पवयीन होते. त्यामुळे निशाचा भाऊ संदीर, सुशील, काका सत्य प्रकाश आणि तिचे वडील नाखुष होते. ते तिला मारहाण करत असल्याचा आरोपही तिच्या पतीने केला आहे. सुनीलच्या कुटुंबीयांनी निशाला स्वीकारले होते. मात्र, निशाचे आईवडील तिच्यावर नाराज होते. अशातच ती तिच्या माहेरी गेली होती.
गुरुवारी (४ जूलै) रात्री तिच्या कुटुंबीयांनी तिच्या हत्येचा कट रचला आणि तिच्यावर गोळी झाडुन तिची हत्या केली. गोळीच्या आवाजाने आजुबाजूचे नागरिक गोळा झाले. त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला. याप्रकरणी निशाच्या कुटुंबीयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.