हिसार - हरियाणामधील हिसारच्या मुर्रा जातीच्या म्हशीने दुधाच्या उत्पादनात जागतिक विक्रम नोंदविला आहे. हिसारच्या मुर्रा जातीच्या म्हशीने 32.66 लिटर दूध देऊन हा विक्रम मोडला. या म्हशीचे नाव सरस्वती आहे. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानातील म्हशीच्या नावावर होता.
लुधियानाच्या जागरांव येथे आयोजित आंतरराष्ट्रीय डेअरी व अॅग्रो एक्स्पोमध्ये सरस्वतीने 32 लीटरपेक्षा जास्त दूध देऊन विश्वविक्रम केला. तीन दिवस चाललेल्या प्रोग्रेसिव्ह डेअरी फार्मर्स असोसिएशनच्या या एक्स्पोचा निकाल सोमवारी जाहीर झाला आहे.
म्हैस मालक सुखबीर ढांडा हे हरियाणाच्या हिसार जिल्ह्यात असलेल्या लिटणी येथील रहिवासी आहेत. सरस्वतीने सर्वाधिक दूध देण्याचा विश्वविक्रम केल्याने मी खुप आनंदी आहे. ही फक्त माझ्यासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद बाब आहे. याचे श्रेय माझी आई कैलो देवी यांना जाते. त्याच सरस्वतीच्या चाऱ्याची काळजी घेतात. हरभरा साला, मका, सोयाबीन, हरभरा, कोंडा, गूळ आणि मोहरीचे तेल सरस्वतीला खायला दिले जाते. उन्हाळ्यात म्हशीसाठी कुलर बसविला जातो. तर हिवाळ्यामध्ये थंडीपासून बचाव केला जातो, असे सुखबीर यांनी सांगितले.
गेल्या वर्षी सरस्वतीने 29.31 लिटर दूध देऊन प्रथम पारितोषिक जिंकले होते. याशिवाय, हिसारच्या सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ बफेलो रिसर्चच्या कार्यक्रमातही तीने 28.7 लिटर दूध देऊन पहिला नंबर पटकावला होता. एवढेच नाही तर हरियाणा पशुधन विकास मंडळाच्या एका कार्यक्रमात त्याने 28.8 लिटर दुधाचे देऊन स्पर्धा जिंकली होती.