पणजी - गोव्यात पुढील ४८ तासांत गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. या काळात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वाहण्याचा अंदाज आहे. मान्सुन गोव्यात अद्याप सक्रीय झालेला नाही. त्यामुळे सर्वांना पावसाची आस लागली आहे.
गोवा हवामान केंद्राने बुधवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार शनिवार (दि. २१) पासून दक्षिण गोवा आणि उत्तर गोव्याच्या जिल्ह्यातील काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह जोरदार पर्जन्यवृष्टी होण्याची शक्यता आहे. तसेच याकाळात वेगाने वारे वाहणार आहेत. या काळात मच्छीमारांसाठी सुरक्षेसंदर्भात सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
मान्सूनच्या दिरंगाईमुळे गोव्यात पावसाची प्रतिक्षा वाढली आहे. परंतु, नुकत्याच झालेल्या 'वायू' वादळामुळे पाऊस पडला. त्यामुळे शेतकरी काही प्रमाणात सुखावला असून शेतीकामांना सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, मान्सून अजूनही सक्रीय झालेला नाही. त्यामुळे नागरिक पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.