नवी दिल्ली - राजस्थानमधील दौसा येथे एका पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सांयकाळी हा प्रकार उघडकीस आला. गिरीराज असे मृताचे नाव असून तो शाहपूर येथील रहिवासी होता. स्थानिक पोलीस ठाण्यात हेड कॉन्स्टेबल म्हणून काम करीत होता.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका पोलीस अधिकाऱयाला त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी दौसा परिसरातील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आला आहे.
दरम्यान घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही. शाहपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते प्रकरणाचा तपास करत आहेत. शवविच्छेदन तपासणीनंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.