नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. पीडित तरुणीचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून त्यामध्ये बलात्काराचा कोणताही उल्लेख नाही. मात्र, अद्याप उत्तर प्रदेश पोलीस फॉरेन्सिक रिपोर्टची वाट पाहत आहेत. पीडितेच्या मणक्याला फ्रॅक्चर झाले होते. तसेच तिचा गळा दाबण्यात आल्याचा उल्लेख अहवालात आहे. याबाबत पोलीस अधिक्षक विक्रांत वीर यांनी अधिक माहिती दिली आहे.
19 वर्षांची तरुणी शेतात गेल्यानंतर चार तरुणांनी तिच्यावर अत्याचार केले होते. तसेच तरुणीला जीवे मारण्याचा प्रयत्नही करण्यात आला. मंगळवारी दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन केले आहे. या घटनेनंतर योगी आदित्यनाथ सरकारवर विरोधक जोरदार टीका करत आहेत.
काँग्रेसने मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हाथरसमधील घटना अद्याप ताजी असतानाच, मध्य प्रदेशमध्येही अशीच एक घटना समोर आली आहे. खरगोन जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.