नवी दिल्ली - जम्मू काश्मीरमध्ये रद्द करण्यात आलेले अनुच्छेद 370 चीनच्या मदतीने पुन्हा लागू करण्यात येईल, असे नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला म्हणाले होते. त्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया आली आहे. फारुख अब्दुला यांची स्वत:ची मते आहे. त्यांच्याशी काँग्रेस सहमत नाही, असे उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांनी म्हटले आहे. बागपतमधील सम्राट पृथ्वीराज महाविद्यालयातील एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. तसेच त्यांनी भाजपावरही निशाणा साधला. भाजपाच्या विचारधारेविरोधात असलेला प्रत्येक व्यक्ती त्यांना जिन्ना किंवा पाकिस्तानी वाटतो, असेही ते म्हणाले.
अब्दुल कलाम यांचाही 'जिन्ना समर्थक' असा उल्लेख करायलाही भाजपा मागेपुढे पाहणार नाही. भाजपाच्या विचारधारेविरोधात असलेली प्रत्येक व्यक्ती त्यांना जिन्ना किंवा पाकिस्तानी वाटते, असे हरीश रावत म्हणाले. तसेच बिहारमध्ये परिवर्तन होत असून महागठबंधन विजयी होईल, असा मला विश्वास आहे. बिहारमधील लोक भाजपाच्या विरोधात असून राहुल गांधींच्या बाजूने आहेत, असेही ते म्हणाले.
उत्तर प्रदेश सरकारवरही हरीश रावत यांनी निशाणा साधला. उत्तर प्रदेशमध्ये मुली सुरक्षित नसून कायदाव्यवस्था राहिलेली नाही, अशी टीका त्यांनी केली. मोदी सरकार जनताविरोधी आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची वाटचाल योग्य दिशेने करण्यासाठी काँग्रेसने कार्य केले आहे. मात्र, काँग्रेस सरकारने उभारलेल्या सर्व संस्था भाजपा विकत असून देशाला कमकुवत करत आहे, असेही ते म्हणाले.