नवी दिल्ली - कोरोना संसर्गाच्या प्रसारामुळे यावर्षीची हज यात्रा रद्द करण्यात आली होती. मात्र, आता २०२१ च्या हज यात्रेची प्रवास प्रक्रिया लवकरच सुरू करण्याबाबत विचार करत असल्याचे केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले. त्यामुळे कोरोना संसर्ग असतानाही पुढील वर्षी हज यात्रा होणार असल्याचे दिसून येत आहे. मात्र, सौदी अरेबियाकडून मार्गदर्शक तत्वे अजून जाहीर करण्यात आली नाहीत.
'हज कमिटी आणि इतर भारतीय संस्था हज २०२१ यात्रेच्या अर्जांची प्रक्रिया ऑक्टोबर/नोव्हेंबर महिन्यापासून सुरू करेल. सौदी अरेबिया सरकार लवकरच हजबाबत मार्गदर्शक तत्वे जारी करेल, अशी आशा आहे. भारतीय प्रशासन सौदी सरकारशी याबाबत सम्नवय साधत आहे, असे नक्वी म्हणाले.
ईटीव्ही भारतशी बोलताना हज कमिटीचे कार्यकारी अध्यक्ष मसूद अहमद खान म्हणाले, अल्पसंख्यांक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्यासोबत आज मुंबईत बैठक झाली. हज कमिटी आणि इतर अधिकारी हज २०२१ ची तयारी करत आहेत, असे ते म्हणाले. आता आम्ही सौदी अरेबिया सरकारच्या मार्गदर्शक तत्वांची वाट पाहत आहोत. त्यानंतर १९ ऑक्टोबरला आम्ही पुन्हा एक बैठक घेणार आहोत. २०२० साली ज्या यात्रेकरूंनी हजसाठी अर्ज केला होता. त्यांना पुन्हा अर्ज करावा लागणार आहे, असे अल्पसंख्यांक मंत्रालयाने आधीच स्पष्ट केले आहे.