जयपूर - राजस्थानात सध्या आरक्षणाच्या मुद्दयावरून गुर्जर आंदोलनाची ठिणगी उडाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क झाले असून जयपूर जिल्ह्यातील गुर्जर बहुल भागातील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती. ते निर्बंध आणखी २४ तासासाठी वाढविण्यात आले आहेत. विभागीय आयुक्त सोमनाथ मिश्रा यांनी याबाबतचा आदेश जारी केला आहे. हे निर्बंध 1 नोव्हेंबरच्या संध्याकाळी 6 वाजल्यापासून 2 नोव्हेंबरला संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वाढविण्यात आले आहेत.
मागासवर्गीय आणि एमबीसी अंतर्गंत देण्यात आलेल्या आरक्षणासंबंधी काही मागण्या पुढे ठेऊन गुर्जर आरक्षण संघर्ष समितीने रविवार पासून आंदोलन पुकारले आहे. गुर्जर समाजाचे कर्नल किरोडी सिंह बैंसला यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे. आंदोलकांनी बयाना-हिडोंन महामार्गावरील पिलूपुरा-कारबारी शहीद स्मारकाजवळ ठिय्या दिला आहे. तसेच रेल्वे मार्गावरील रुळाच्या काही कड्या त्यांनी काढल्या आहेत.
३० तारखेपासून सेवा बंद-
गुर्जर आंदोलनाची आक्रमकता पाहून प्रशासनाने जयपूरमधील गुर्जर बहुल असलेल्या कोटपूतली, पावटा, शाहपुरा, विराटनगर आणि जमवारामगड येथील इंटरनेट सेवा ३० तारखेपासून खंडित केली आहे. कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला. आता ती सेवा बंद आणखी २४ तासाची वाढ करण्यात आली आहे.
कारवाई केली जाणार-
विभागीय आयुक्त सोमनाथ मिश्रा यांनी या बाबत प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, की जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेता इंटरनेट सेवेवर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोटपुतली, पावटा, शाहपुरा, विराटनगर, जमवारामगड या व्यतिरिक्त फागी, माधोराजपुरा, दूदू और मोजमाबाद या ठिकाणीही इंटरनेट सेवेवर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई केली जाणार आहे.