पणजी- गोव्याची राजधानी पणजीतील आझाद मैदानावर आज धुमधडाक्यात धुलीवंदन आणि गुलालोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. पणजी शिगमोत्सव समितीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमात स्थानिकांबरोबर विदेशी पर्यटकांनी सहभागी होत धुळवड साजरी केली.
या गुलालोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक राजकारण्यांसह सर्वधर्मीय लोक मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी होत गीत आणि नृत्याचा आनंद घेत असतात. आज सकाळी पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्या उपस्थितीत या उत्सवाला सुरुवात झाली. सुमारे साडेतीन तास चाललेल्या या गुलालोत्सवात लोक एकमेकांना रंग लावत संगीताच्या तालावर ठेका धरताना दिसले. यामध्ये विदेशी पर्यटकही सहभागी झाले होते. यावेळी बोलताना आमदार मोन्सेरात म्हणाले, लोकांनी शांततेत होळी सणाचा आनंद घ्यावा. गोव्याला सांस्कृतिक एकतेची परंपरा आहे. त्यामुळे यामध्ये सर्वधर्मीय मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले दिसतात. अशावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची आठवण येते. कारण ते न चुकता या धुलीवंदनाच्या कार्यक्रमात सहभागी होत असतात.
तर, पणजी शिगमोत्सव समितीचे कार्यकारी अध्यक्ष मंगलदास नाईक म्हणाले, समिती मागील ३२ वर्षांपासून अशाप्रकारे शिगमोत्सव साजरा करत आहे. परंतु, यावेळसारखी स्थिती कधी उद्भवली नाही. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लोक या उत्सवात सहभागी होतील की नाही, अशी भीती वाटत होती. परंतु, लोकांनी ही भीती बाजूला सारत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. समितीच्या कार्यक्रमाला आजपासून सुरुवात झाली असून ते ५ दिवसांपर्यंत सुरू राहील. यावेळी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची आठवण येत राहील. कारण, ते मुख्यमंत्री असो अथवा संरक्षण मंत्री या कार्यक्रमात सहभागी व्हायचे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य खात्याने केलेल्या सूचनेवरून मैदानात घातलेला मंडप काढून मोकळ्या जागेत हा उत्सव आयोजित करण्यात आला. यावर्षी विदेशी नागरिक विशेषतः युवती मोठ्या संख्येने या उत्सवात सहभागी झाल्या होत्या. तसेच त्यांनी गुलाल उधळण आणि नृत्याचा आनंदही घेतला.
हेही वाचा- 'काँग्रेसचं सरकार पाडण्यात भाजपला रस नाही'