नवी दिल्ली - भारतीय भूप्रदेश चीनच्या हद्दीत दाखविल्यावरून सरकारने ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डॉर्सी यांना पत्र लिहून कठोर शब्दात इशारा दिला आहे. भारतीय नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आला असून देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मतेबद्दल कधीही तडजोड केली जाणार नाही, असे भारताने म्हटले आहे. तसेच ट्विटरच्या या कृतीवरून नाराजी दर्शवत हे बदल कधीही स्वीकारार्ह नसल्याचे म्हटले आहे.
लेह दाखविले चिनी हद्दीत
लडाख केंद्रशासित प्रदेशातील लेह हा भारतीय भूप्रदेश ट्विटरने चीनमध्ये दाखविला आहे. त्यावरून भारताने मायक्रो ब्लॉगिंग साईट ट्विटरला इशारा दिला आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव अजय सावनी यांनी ट्विटरला पत्र लिहले आहे. या कृतीमुळे ट्विटरची बदनामी असून तुमच्या तटस्थता आणि प्रामाणिकतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत, असे पत्रात सावनी यांनी म्हटले आहे. ट्विटरने भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखविल्याबद्दल सावनी यांनी कठोर शब्दांत पत्र लिहून नाराजी दर्शविल्याची माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील सुत्रांनीही दिली आहे.
लडाख काश्मीर भारताचा अविभाज्य भाग
लेह भारतीय केंद्रशासित प्रदेश लडाखचे मुख्यालय असून जम्मू काश्मीर आणि लडाख भारताचे अविभाज्य भाग असल्याची आठवण सावनी यांनी पत्रातून ट्विटरच्या सीईओला करून दिली. तसेच भारतीयांच्या संवेदनांचा आदर करण्याचे आवाहन ट्विटरला केले.