नवी दिल्ली - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रेल्वेचे खासगीकरण करण्याच्या निर्णयावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. रेल्वेचे खासगीकरण करून सरकार गरीबांची जीवनरेषा (लाईफलाईन) त्यांच्यापासून हिसकावून घेतेय, जनता सरकारच्या या निर्णयाला उत्तर देईल, असे राहुल गांधी म्हणाले.
'रेल्वे ही गरीबांची एकमेक लाईफलाईन आहे. ती सुद्धा सरकार त्यांच्यापासून हिसकावून घेत आहे. तुम्हाला जे काही हिसकावून घ्यायचयं ते घ्या. पण जनता तुम्हाला योग्य उत्तर देईल, असे राहुल गांधी म्हणाले.
भारतीय रेल्वेत खासगी क्षेत्राला शिरकाव करण्यास परवानगी दिल्यानंतर राहुल गांधींनी ही टीका केली. 151 अत्याधुनिक रेल्वे गाड्या चालविण्यासाठी सरकारने खासगी उद्योगांचे अर्ज मागविले आहेत. खासगी उद्योगांना प्रवासी गाड्या चालवण्याची परवानगी देण्यात येणार आहे. याद्वारे खासगी क्षेत्राची 30 हजार कोटी गुंतवणूक रेल्वेत होईल, असे रेल्वे मंत्रालायने बुधवारी म्हटले.
अत्याधुनिक तंत्रज्ञान, कमी देखभाल खर्च, प्रवासाचा कमी वेळ, रोजगार निर्मिती, अधिक सुरक्षा आणि सुखकर प्रवासाचा अनुभव देण्याचे उद्दिष्ट या प्रकल्पामागे आहे, असे रेल्वे मंत्रालायने म्हटले. 109 ठिकाणांवरून ही रेल्वे सुटेल. तर प्रत्येक गाडीला 16 डबे असतील. मागील वर्षी रेल्वेने तेजस रेल्वे खासगी तत्वावर सुरु केली आहे.