नवी दिल्ली - आपण बँकेकडून घेतले त्याहून अधिक रुपये सरकारने वसूल केले आहेत, असे फरार आरोपी विजय मल्ल्याने टि्वट करत म्हटले आहे.
'पंतप्रधान मोदींची मुलाखत बघितली. या मुलाखतीत त्यांनी माझे नाव घेतले आणि सांगितले की माझ्यावर ९ हजार कोटींचे कर्ज आहे. मात्र, त्यांच्या सरकारने तर माझी १४ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. मोदींनीच याची खातरजमा केली आहे, तरीही भाजपचे प्रवक्ते माझ्यावर टिप्पणी करतच आहेत', असेही मल्ल्याने टि्वटमध्ये म्हटले आहे.
मी १९९२ पासून ब्रिटनचा रहिवासी आहे. तरीही भाजप म्हणत आहे की मी भारतातून पळून गेले, असेही मल्ल्याने सांगितले. नुकतेच सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मल्ल्याचे शेअर्स विकून १००८ कोटी रुपये जप्त केले होते.
मुलाखतीत काय म्हणाले पंतप्रधान मोदी? -
'आम्ही विजय मल्ल्याच्या कर्जापेक्षा जास्त त्याची संपत्ती जप्त केली आहे. मल्ल्यावर ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज आहे. मात्र, आम्ही मल्ल्याची जगभरातील १४ हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. यापूर्वीही लोक फरार होत असत. सरकार त्यांची नावे जाहीर करत नव्हते. आम्ही त्यांच्याविरोधात कारवाई केली, म्हणून ती लोकं पळून जात आहेत', असे मोदी म्हणाले. त्यांनी नुकतीच एका खासगी वाहिनीला मुलाखत दिली होती. यावेळी ते बोलत होते.