नवी दिल्ली - सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) संचालक एस.के मिश्रा यांना वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. 1984 च्या बॅचचे आयआरएस अधिकारी मिश्रा यांची ईडी संचालक म्हणून 19 नोव्हेंबर 2018 रोजी दोन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ येत्या 18 नोव्हेंबरला संपणार असताना त्यांना मुदतवाढ देण्यात आली.
एक वर्षासाठी मुदतवाढ मिळालेले पहिलेच संचालक
ईडीचे ते पहिले असे संचालक बनले आहेत, ज्यांना निवृत्तीनंतर एक वर्षासाठी मुदतवाढ मिळाली आहे. 27 ऑक्टोबर 2018 रोजी करनालसिंह सेवानिवृत्त झाल्यानंतर मिश्रा यांच्याकडे पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. राष्ट्रपतींच्याकडून त्यांची एकूण तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर तीन वर्षे पुढील आदेशनिघेपर्यंत ते पदावर राहतील, असे त्यात सांगण्यात आले आहे.