नवी दिल्ली - वाढत्या इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने सोमवारी देशव्यापी आंदोलन केले. यावेळी पक्षाच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधींनी सरकारवर निशाणा साधला. कोरोना महामारीमुळे सामान्य नागरिक अगोदरच आर्थिक संकटात असतानाही, चढ्या दराने पेट्रोल-डिझेल विक्री करत सरकार केवळ आपली तिजोरी भरत आहे, असे त्या म्हणाल्या.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी देशातील जनतेला संबोधित केले. "आज पेट्रोल आणि डिझेलचे दर हे ८० रुपयांच्या पुढे गेले आहेत. २५ मार्चला लॉकडाऊन लागू केल्यानंतर मोदी सरकारने आतापर्यंत तब्बल २२ वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले आहेत. डिझेल आतापर्यंत ११ रुपये प्रतिलिटर आणि पेट्रोल सुमारे ९ रुपये प्रतिलिटर एवढे महाग झाले आहे. यासोबतच एक्साईज ड्यूटी वाढवून दरवर्षी लाखो रुपयांचा नफा मोदी सरकारने कमावला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाचे दर दिवसेंदिवस कमी होत असताना, देशात मात्र पेट्रोल-डिझेलची विक्री चढ्या दराने होत आहे." असे त्या यावेळी म्हणाल्या.
२०१४नंतर कच्च्या तेलाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी होत आहेत. मात्र, याचा देशातील नागरिकांना कोणताही फायदा होत नाही. उलट मोदी सरकारने १२ वेळा पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज ड्यूटी वाढवली आहे, ज्यामुळे सरकारला आतापर्यंत १८ लाख कोटींचा फायदा झाला आहे. लोकांच्या पैशातून स्वतःचे खिसे भरण्याचे हे उत्तम उदाहरण आहे. कोरोना महामारीमुळे आधीच देशातील सामान्य जनता आर्थिक संकटात आहे. त्यात सरकारचे हे कर्तव्य आहे, की जनतेला दिलासा देईल असे निर्णय घ्यावेत. मात्र, हे सरकार या महामारीचाही फायदा घेत आपली तिजोरी भरत आहे. लोकांकडून सुरू असलेली ही वसूली ही केवळ असंवैधानिक नाही, तर असंवेदनशीलही आहे; असे त्या पुढे म्हणाल्या.
आजच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जनतेला 'स्पीक अप इंडिया अगेन्स्ट फ्यूएल हाइक' या हॅशटॅगचा वापर करण्याचेही आवाहन केले. त्यांनी यासंबधित एक व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.
हेही वाचा : 'माझं व्हेंटिलेटर काढलं, मला श्वास घेता येत नाही, बाय डॅडी बाय'; कोरोना रुग्णाचा 'तो' शेवटचा व्हिडिओ