नवी दिल्ली - केंद्र सरकारने अनेक दिवसांपासून लागू असलेली कांदा निर्यात बंदी उठवली आहे. बाजारात कांदा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे आणि येत्या काळात आणखी कांद्याचे उत्पन्न वाढणार असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. कांदा निर्यात बंदीमुळे देशांतर्गत बाजारातली कांद्याचे भाव कोसळले होते. मात्र, निर्यात बंदी उठवल्यामुळे शेकऱ्यांना आता चांगला भाव मिळणार आहे.
कांद्याची निर्यात बंदी उठवावी, अशी मागणी शेकऱ्यांकडून अनेक दिवसांपासून सुरू होती. ही बंदी उठवल्यामुळे शेतकऱ्यांना आता चांगला भाव मिळेल असे अन्न आणि ग्राहक मंत्रालयाने म्हटले आहे. मागील वर्षीपेक्षा ४० टक्के जास्त कांदा पीक येत्या मार्चमध्ये बाजारात येणार असल्याचेही मंत्रालयाने सांगितले.
कांद्याच्या किंमती आता स्थिरावल्या असून मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात येत आहे. निर्यात बंदी सुरू ठेवल्याने आणखी कांद्याचे भाव कमी झाले असते त्यामुळे बंदी उठवण्यात आली आहे.
सप्टेंबर २०१९ पासून होती निर्यात बंदी
देशांतर्गत काद्यांचे कमी उत्पादन आणि अवकाळी पावसामुळे पीक मोठ्या प्रमाणात वाया गेले होते. त्यामुळे देशांतर्गत बाजारात कांद्याचा तुटवडा निर्माण झाला होता. कांद्याचे दर दीडशे रुपये प्रति किलोच्या पुढे गेले होते. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या घरातून कांदा गायब झाला होता. सरकारने स्वस्त दरात कांद्यांची विक्री सुरू केली होती. तसेच कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यामुळे देशांतर्गत बाजारात कांद्याच्या किमती नियंत्रणात येण्यास मदत झाली होती.