तिरुवनंतपूरम - केरळमध्ये तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर 30 किलो सोने जप्त करण्यात आले होते. घटनेनंतर संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. दरम्यान युएईच्या वाणिज्य दूतावासात संलग्न असलेला केरळ पोलीस अधिकारी गुरुवारी रात्रीपासून बेपत्ता असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
युएई वाणिज्य दूतावासात तैनात केरळ पोलिसांचा सुरक्षा अधिकारी जयघोष हा गुरुवारी रात्रीपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे, असे शुक्रवारी माध्यमांशी बोलताना वरिष्ठ पोलीस अधिकारी अनिल कुमार यांनी सांगतिले. जयघोषला शोधण्यासाठी चौकशी सुरू झाली असून श्वान पथकाची मदत घेतली जाणार आहे. आम्ही त्याच्या कॉल रेकॉर्डची वाट पाहत आहोत, असे ते म्हणाले.
काही अज्ञात लोकांनी त्याला धमकावले होते, असे जयघोषच्या नातेवाईकांनी सांगितले. तसेच या महिन्याच्या सुरुवातीला स्वप्ना सुरेशने जयघोषला बऱ्याचवेळा बोलावले होते, अशी माहिती समोर येत आहे.
एफआयआर नोंद झाल्यानंतर एनआयएने सोने तस्करी प्रकरणी स्वप्ना सुरेश आणि संदीप नायर यांना बंगळुरु येथून अटक केली. या दोघांना सध्या दोन दिवसीय न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सीमा शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सरीत कुमार याला तस्करी प्रकरणी अटक केली होती. तो यापूर्वी संयुक्त अरब अमिरातीच्या वाणिज्य दूतावासात जनसंपर्क अधिकारी होता. त्याला कोची येथील अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालयाने केरळ स्थित विदेशी महावाणिज्य दूतावरील कर्मचारी सरीत याला सीमा शुल्क विभागाची कोठडी सुनावली होती.
तिरुअंनतपूरम विमानतळावर तब्बल 30 किलोची सोने तस्करी पकडण्यात आली होती. राजनैतिक अधिकाऱ्यांच्या सामानामधून ही तस्करी करण्यात आली होती. तस्करीच्या रॅकेटमधील मुख्य संशयित स्वप्ना सुरेश ही राज्यातील सत्ताधारी माकपच्या डाव्या लोकशाही आघाडी सरकारची निकटवर्ती मानली जाते. कोट्यवधींच्या या सोने तस्करी रॅकेट प्रकरणातून मालामाल झालेल्यांची नावं शोधण्यात येत आहेत.