अमरावती - मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश राज्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. गोदावरी नदी क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने आंध्र प्रदेशातील नदी किनारी भागात पूर आला आहे. तसेच पूराची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. नदीशेजारील सखल भागात असणाऱ्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. काही गावांचाही संपर्क तुटला आहे. आपत्ती निवारण पथक नागरिकांना मदत करत आहे.
गोदावरी नदी महाराष्ट्रातून पुढे आंध्रप्रदेशात जाते. नदीच्या वरच्या क्षेत्रात म्हणजे महाराष्ट्रातही जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे गोदावरी नदीने रौद्र रुप धारण केले आहे. धवलेश्वरम धरणामुळे नदीची पाणी पातळीही वाढली आहे. या धरणाची पाणी पातळी १४.९ फूटावर गेली असून सुमारे १४ लाख क्यूसेक पाणी सोडण्यात आले आहे.
सिंचन विभागाने धरण आणि नदी शेजारील सखल भागात राहणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पूराचा प्रभाव नदीच्या बाजून असलेल्या पूर्व आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यांवर जास्त झाला आहे. पूर्व गोदावरी जिल्ह्यातील १९ मंडळे म्हणजेच ब्लॉकला पूराचा धोका निर्माण झाला आहे. पूराच्या पाण्यामुळे रस्ते पाण्याखाली गेले असून नागरिक अडकूनही पडले आहेत. आपत्ती निवारण पथक नागरिकांना बाहेर काढण्याचे काम करत आहे.
गोदावरी नदीशेजारील कोनासीमा भागाला पूराचा सर्वात जास्त फटका बसला आहे. येथील गावांमध्ये आणि शेतामध्ये पूराचे पाणी शिरले आहे. अनेक पूलही पाण्याखाली गेले आहेत. १० गावांचा संपर्क तुटला असून नागिकांना बोटीने प्रवास करावा लागत आहे. शेकडो हेक्टरवरील शेतजमीन पाण्याखाली गेली आहे.
पोलावरम भागही पाण्याखाली
गोदावरी नदीवरील पोलावरम धरण भागातही पुराचे पाणी शिरले आहे. प्रशासनाने येथील सखल भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. एर्राकुलुवा येथे एक व्यक्तीही पुरामध्ये बुडाल्याची माहिती मिळत आहे.