पणजी - कर्नाटककडून होणारा विद्युत पुरवठा गेले काही दिवस बंदच आहे. या मार्गावरील विद्युत वाहिनी दुरुस्तीसाठी मोठ्या अडचणी येत असल्याने दक्षिणेकडून होणारा हा विद्युत पुरवठा अनिश्चित काळासाठी थांबविण्यात आला आहे. तर पश्चिम विभागाडून होणारा विद्युत पुरवठा दक्षिण गोव्याकडे वळविण्यात आला आल्याची माहिती गोव्याचे वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी सोमवारी दिली.
सचिवालय सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना काब्राल म्हणाले, दक्षिण गोव्याला कर्नाटकच्या बाजूने दक्षिण विभागाकडून होणार वीजपुरवठा वारंवार खंडित होत असून गेले काही दिवस बंदच आहेत. त्यामुळे दक्षिण गोव्यातील वीजग्राहक हैराण झाले आहे. त्यांच्या रोषाला सरकार आणि वीज कर्मचाऱ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सरकारने हा पुरवठा बंद करून पश्चिम विभागाकडून होणारा पुरवठा दक्षिण गोव्यात वळविण्याचा निर्णय घेतला आहे.
धारबांदोडा येथे सुमारे एक लाख चौरस मीटर जागा संपादित करून नवे सबस्टेशन उभारले जात आहे. याचे काम पुढील तीन वर्षात पूर्ण होईल. ज्यामुळे छत्तीसगड येथून थेट वीज आयात करता येईल. तोपर्यंत पश्चिम विभागाकडील पुरवठा कायम राहील. यामध्ये कोलवाळ येथे तिलारीतून महालक्ष्मीकडील वीज घेण्यात येणार आहे. गोवा वीजनिर्मिती करत नाही. परंतु, दररोज एक हजार किलोवँट वीज आयात करतो. मात्र त्यातील 660 किलोवँट वीजेचा वापर केला जात असल्याचे काब्राल म्हणाले.
यापुढे गोवा सरकार कोणताही नादुरुस्त ट्रान्स्फॉर्मर दुरूस्ती करणार नाही, तर त्या ठिकाणी नवा ट्रान्स्फॉर्मर बसविला जाईल. तसेच नव्याने मध्यम सबस्टेशन उभारण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. ज्यामुळे वीजपुरवठा सुरळीत करणे सोपे होईल आणि कोणत्याही ग्राहकाचा वीजपुरवठा बंद होणार नाही असे काब्राल म्हणाले. गोवा असे राज्य आहे, जेथे थकबाकी असली तर घरगुती नव्हे केवळ व्यावसायिक वीजपुरवठा काही काळ खंडित केला जातो.