पणजी - गोव्यामध्ये इस्राईली पर्यटकांवर दहशतवादी हल्ला होण्याची गुप्त माहिती मिळाली आहे. त्यानंतर संपूर्ण गोव्यात अतिदक्षतेचा इशारा जाहीर करण्यात आला आहे. तर, इस्राईली नागरिकांच्या सुरक्षतेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय सुरक्षा संस्थेला याबद्दल माहिती मिळाली होती.
गोव्यामध्ये दरवर्षी मोठ्याप्रमाणत इस्राईली नागरिक पर्यटनासाठी येतात. मात्र, सध्या गोव्यामध्ये पर्यटनाचा हंगाम संपत आहे. त्यामुळे गोव्यामध्ये इस्राईली पर्यटकही कमी प्रमाणात आढळतात. परंतु कोणतीही आक्षेपार्ह घटना घडू नये म्हणून राज्यातील सर्वच सुरक्षा संस्थेला सतर्कतेचा आदेश देण्यात आले आहेत.
गोव्यामध्ये इस्राईली नागरिकांवर आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा हल्ला होण्याची शक्यता आहे. त्या माहितीची खातरजमा गोवा पोलीस करत आहे. सुरक्षेसाठी आम्ही अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. तसेच राज्य सुरक्षा यंत्रणेला आम्ही सूचनाही दिल्या आहेत, असे गोव्याचे पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंह यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.