पणजी - तिसऱ्या मांडवी (अटलसेतू) पुलाचे विद्युत रोषणाई कामामध्ये गोवा साधन सुविधा महामंडळाने सुमारे 35 कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. याचे काँग्रेसजवळ पुरावे असून आम्ही लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली. ते आज पत्रकार परिषदेत बोलत होते.
काँग्रेस भवनात आयोजित पत्रकार परिषदेत चोडणकर म्हणाले, यापूर्वी अनेकदा या कामात भ्रष्टाचार झाल्याचे, आम्ही वारंवार सांगत आलो आहे. आता आमच्या हाती या संदर्भात भक्कम पुरावे लागले आहेत. यासाठी मूळ निविदेत फेरफार करण्यात आला आहे. या कामासाठी आतापर्यंत 2 वेळा ठेकेदार कंपनीला रक्कम देण्यात आली आहे. ज्यामध्ये 11 जानेवारी 2019 रोजी 5 कोटी 86 हजार 483 रूपये तर 22 जानेवारी 2019 रोजी 3 कोटी 68 लाख 30 हजार 58 रूपये एवढी रक्कम दिली आहे.
मात्र, या सर्वांना जीएसायडीसीच्या टेक्निकल परवानगी समितीने मंजुरी दिलेली नाही. असे सांगून चोडणकर म्हणाले, आम्ही या विरोधात आवाज उठवत राहिल्याने त्यानंतर रक्कम देण्यात आलेली नाही. आता आम्ही याविरोधात लोकायुक्तांकडे तक्रार दाखल करून याची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी करणार आहोत. त्याबरोबर यामध्ये जे सहभागी आहेत त्यांना शिक्षाही झाली पाहिजे. असंही त्यांनी सांगितलं. यावेळी पक्ष प्रवक्ते ट्रोजन डिमेलो, उर्फान मुल्ला आदी उपस्थित होते.