पणजी - गोव्याचे स्वतंत्र अस्तित्व आणि ओळख राखण्यासाठी हिमाचलच्या धर्तीवर वेगळा कायदा करण्याची गरज आहे. त्यासाठी संसदेत आग्रह धरणार असल्याचे प्रतिपादन गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज केले. येथील काँग्रेस भवनात काँग्रेसने गोव्यासाठी स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला.
यावेळी विरोधीपक्षनेते चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, रवी नाईक, लुईझिन फालेरो, आमदार जेनिफर मोन्सेरात, नीळकंठ हळर्णकर, आलेक्स रेजिनाल्ड, महिला काँग्रेस अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, उत्तर गोवा जिल्हाध्यक्ष विजय भिके आदी उपस्थित होते.
खाण व्यवसाय बंद झाल्यामुळे येथील गोमंतकियांना मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचा सामना करावा लागला, असे सांगून चोडणकर म्हणाले, काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर कायद्याच्या चौकटीत खाण व्यवसाय सुरू केला जाईल. तसेच फॉर्मेलीनमुक्त मच्छीसाठी आवश्यक त्या सर्व तरतुदी केल्या जातील.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देणार - कवळेकर
२०१४ च्या निवडणुकीत भाजपने सत्तेवर आल्यानंतर गोव्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ५ वर्षे सत्तेत राहूनही हा दर्जा देण्यात आलेला नाही, असे सांगून विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर म्हणाले, काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर आम्ही गोव्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देऊ.