पणजी - गोवा सरकारकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणारे शैक्षणिक कर्ज मागील २ वर्षे वितरित करण्यात आलेले नाही. त्यामुळे गोमंतकीय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे सरकारने हे कर्ज संबंधितांपर्यंत तत्काळ पोहोचवावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
पणजीतील भवनात आयोजित पत्रकार परिषदेसाठी गोवा प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अमरनाथ पणजीकर, सोशल मीडिया सेलच्या प्रतिभा बोरकर, एनएसयुआयचे राज्य अध्यक्ष एराज मुल्ला आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना पणजीकर म्हणाले, गोमंतकीय विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी यासाठी राज्य सरकारने व्याज मुक्त शैक्षणिक कर्ज योजना सुरू केली. ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ होत आहे. परंतु, मागील २ वर्षे अशा प्रकारच्या कर्जाचे वितरण सरकारी तिजोरीतून संबंधित शैक्षणिक संस्थापर्यंत पोहचलेले नाही. त्यामुळे या संस्थानी विद्यार्थ्यांकडे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी तगादा लावला आहे. त्यामुळे काही पालकांलर खासगी कर्ज काढण्याची वेळ आली आहे.
मुख्यमंत्री हेच शिक्षण मंत्री आहेत. परंतु, कामाच्या व्यापामुळे त्यांना शिक्षण क्षेत्राकडे लक्ष देता येत नाही, असे सांगून पणजीकर म्हणाले, सरकारने ही रक्कम का दिली नाही याचे स्पष्टीकरण द्यावे. तसेच वैद्यकीय प्रवेशासाठी किमान ५ लाखांची बँक गँरंटी कशासाठी हेही सांगावे. की, केवळ श्रीमंतांना उच्च शिक्षण घेता यावे याची तजवीज करत आहे.
दरम्यान, राज्यात कंत्राटी पद्धतीने मागील ५ वर्षांहून अधिक काळ काम करणाऱ्या व्यावसायिक अभ्यासक्रम शिक्षकांना सरकारी सेवेत काम करावे. 7 वर्षे होऊनही काहीजण सेवेत कायम होण्याच्या प्रतीक्षेत आहे. त्यांना कायम करावे तसेच ज्यांच्यावर अशा प्रकारचा अन्याय झाला. त्यांच्यावरील अन्याय दूर करावा, अशी मागणी पणजीकर यांनी यावेळी केली.