दरभंगा - एका 13 वर्षीय चिमुकलीने आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसवून तब्बल 1300 किलोमीटरचा प्रवास करत सुखरूप घरी आणले आहे. ज्योती असे त्या चिमुकली मुलीचे नाव असून दरभंगा जिल्ह्यातील सिंहवाडा येथील सिरहुल्ली गावातील ही घटना आहे. मोहन पासवान असे ज्योतीच्या वडिलांचे नाव असून, त्यांनाही आपल्या मुलीचा अभिमान वाटत आहे.
मोहन हे गुरुग्राम येथे रिक्षा चालवत आपल्या परिवाराचा गाडा हाकत आहेत. अशातच जानेवारी महिन्यात मोहन यांचा अपघात झाला होता. या अपघातात त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. अशातच मार्चमध्ये कोरोनाचे संकट आले आणि संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला. सर्वत्र बंद असल्यामुळे मोहन यांचा रिक्षाचा व्यवसायही बंद पडला. पैसे मिळत नसल्यामुळे घर चालवायचे कसे, उपचाराचा खर्च करायचा कसा असे अनेक पश्न त्यांच्यासमोर होते. तसेच गुरुग्राम येथील घरमालकानेही त्यांना भाडे न दिल्यामुळे घरातून बाहेर काढले होते.
500 रुपयांमध्ये घेतली सायकल -
वडिलांची परिस्थिती पाहून त्यांच्या 13 वर्षाच्या ज्योतीने 500 रुपयांमध्ये एक सायकल खरेदी केली. त्यानंतर तिने वडिलांना घेऊन गुरुग्राम ते दरभंगा असा जवळपास 1300 किलोमीटरचा प्रवास 8 दिवसात सायकलवर करत वडिलांना सुखरूप घरी पोहोचवले आहे. याप्रवासादरम्यान अनेकांनी मदत केल्याचे ज्योती सांगते.
दरम्यान, आपल्या मुलीवर मोहन पासवान यांना गर्व असून तिच्यामुळेच मला दुसरा जन्म मिळाला असल्याचे मोहन सांगतात.