पाटणा - भाजप नेते आणि केंद्रीय पशुपालन मंत्री गिरिराज सिंह वादग्रस्त वक्तव्यावरून कायम चर्चेत असतात. नुकतेच ते बिहारमध्ये आले असता त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तुलना उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याच्याबरोबर केली. ममता बॅनर्जी ह्या हुकूमशाहाची भूमिका निभावत आहेत. जसे उत्तर कोरियात विरोधकांचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही, त्याप्रमाणे बंगालमध्ये विरोधकांचे काहीही ऐकून घेतले जात नाही, असे सिंह म्हणाले.
संघराज्यीय व्यवस्थेवर ममता दिदींचा हल्ला
यावेळी बोलताना गिरिराज सिंह म्हणाले, ममता बॅनर्जी संघराज्याच्या व्यवस्थेला तोडण्याचे काम करत आहेत. बंगाल सरकार केंद्राच्या अनेक कल्याणकारी योजना राज्यात लागू करत नाही. त्यामुळे बंगालमधील जनतेचे नुकसान होत आहे, असा आरोपही त्यांनी केला. आगामी विधानसभा निवडणूकीत ममता बॅनर्जी यांना घरी बसवण्याचा निर्णय बंगालच्या जनतेने घेतला आहे. ममता बॅनर्जी यांच्यासह घुसखोरांना देशाबाहेर लावण्यासाठी राज्यात भाजपचे सरकार येईल, असे ते म्हणाले.