गांधीनगर - गुजरातमधील ओलपाड-सुरत राज्य महामार्गावर मासमा गावाजवळ एलपीजी गॅस सिलेंडर भरलेला ट्रक उलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातानंतर ४ वाहनांना आग लागली. ट्रक उलटल्यानंतर शेजारून जाणारी स्कूल बस, टेम्पो आणि रिक्षा या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. परिसरातील स्थानिकांनी प्रसंगावधान राखत स्कूल बसमधील २५ विद्यार्थ्यांना बाहेर काढले.
सिलेंडर भरलेल्या ट्रकला आग लागल्याने स्फोट झाला. या स्फोटचा आवाज ऐकून परिसरातील लोक घटनास्थळी धावले. सोबतच स्थानिक पोलीस, सुरतहून आग्निशामक दलाचे पथक आणि इतर लोक दाखल झाले.
आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाने पाण्याचा मारा केला. तसेच या आगीची तीव्रता वाढू नये, यासाठी परिसरातील घरांमध्ये असलेले सिलेंडर बंद करायला सांगितले. वीज पुरवठाही काही काळासाठी बंद करण्यात आला होता. या घटनेनंतर ओलपाड-सुरत महामार्ग काही काळासाठी बंद करण्यात आला होता. वाहने इतर मार्गाने वळवण्यात आली होती.