कच्छ - 'धूम-२' या चित्रपटावरून प्रेरित होऊन 'हायटेक' चोरी करणाऱ्या एका टोळीला गुजरात पोलिसांनी अटक केले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यामधील एटीएम लुटण्याच्या घटनांमध्ये या टोळीचा हात आहे. गुगल मॅपचा वापर करून ही टोळी एटीएमच्या लोकेशनचा पत्ता लावत असे. त्यानंतर, तोंडाला मास्क लाऊन आणि हातमोजे घालून ते एटीएममध्ये जात. आत गेल्यावर, सर्वात आधी ते सीसीटीव्ही कॅमेरे निकामी करत. आणि, चोरी करून झाल्यानंतर चारचाकी गाडीमधून पोबारा करत.
विशेष म्हणजे, चारचाकी गाडीमधून पोबारा केल्यानंतर काही वेळातच ती गाडी दिसेनासी होत. धावती चारचाकी गाडी, चालू कंटेनर ट्रकमध्ये चढवत ही टोळी लीलया गायब होत असे.
ते ज्या गाडीमधून जात होते, ती बोलेरो गाडी आम्हाला कोणत्याही सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दिसली नाही. त्या रस्त्यावर पुढे असलेल्या टोलनाक्यावरच्या सीसीटीव्हीमध्ये देखील आम्हाला ती गाडी दिसली नाही. त्यामुळे, आम्हाला ती गाडी मोठ्या कंटेनर ट्रकमध्ये असल्याचा संशय आला. त्यादृष्टीने पाहणी केल्यावर आम्हाला ती गाडी एका कंटेनर ट्रकमध्ये मिळाली. अशी माहिती, पूर्व कच्छच्या पोलीस अधिक्षक परिक्षिता राठोड यांनी दिली.
ही टोळी हरियाणाच्या मेवात भागातील असल्याचा पोलिसांना संशय आहे.