पटना - राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी त्यांच्या आयुष्यात ज्या-ज्या ठिकाणांना भेट दिली, त्या-त्या ठिकाणांची त्यांच्याशी नाळ जुळली. मात्र, ज्या ठिकाणांचा गांधीजींवर प्रभाव पडला अशा ठिकाणांमध्ये चंपारणचा समावेश होतो. कारण, याच ठिकाणी सविनय कायदेभंग चळवळीची सुरुवात झाली होती.
चंपारणमध्येच गांधीजींना 'महात्मा' ही ओळख मिळाली. चंपारणमधील आंदोलनाच्या प्रभावामुळे भारतातील ब्रिटिशांना उघड-उघड आव्हान दिले गेले.
ब्रिटिशांच्या काळात, चंपारणमध्ये जमीनदारांकडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर शोषण होत. १९१६ला झालेल्या लखनऊमधील काँग्रेसच्या अधिवेशनात, राज कुमार शुक्ल यांनी गांधींची भेट घेऊन ही बाब त्यांना सांगितली. त्यांच्या विनंतीवरून गांधीजींनी १९१७मध्ये चंपारणला भेट दिली.
२४ एप्रिल १९१७ मध्ये गांधीजी बैरियातील लौकरिया गावात पोहोचले. तिथे त्यांनी गिल या ब्रिटिश अधिकाऱ्याची भेट घेतली. त्यानंतर २७ एप्रिलला ते नारकतीगंज गावात पोहोचले, आणि त्यानंतर मुरलीभरवा गावात त्यांनी शुक्ल यांची भेट घेतली. तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिले, की शुक्ल यांच्या घराचे ब्रिटिशांनी नुकसान केले होते. त्यानंतर, गांधीजींनी ब्रिटिशांना उघडपणे आव्हान दिले. त्यानंतर शुक्ल यांच्या विनंतीवरून गांधीजी भितीहरवा गावात पोहोचले, आणि त्यांनी स्वतः तिथे आश्रम बांधण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांना बाबा राम नारायण यांनी जमीन दान दिली. १६ नोव्हेंबर पर्यंत गांधीजींनी तिथे एक झोपडी आणि शाळा बांधली.
गांधीजींनी तेव्हा बांधलेली झोपडी आजही तिथे आहे. त्या झोपडीला नुकसान पोहचू नये यासाठी त्या झोपडीवर शेड बांधण्यात आले आहे. कस्तुरबा गांधी यांनी वापरलेले जाते देखील या झोपडीत अजूनही आहे. शिवाय, गांधीजी यांनी वापरलेला टेबल सुद्धा इथे प्रदर्शनासाठी ठेवला आहे. यासोबतच, गांधीजींनी सुरू केलेल्या शाळेची घंटा आणि आश्रमाच्या आवारात असलेली विहीर देखील पर्यटकांना पाहण्यासाठी खुली आहे. दरवर्षी कित्येक पर्यटक गांधीजींच्या ही झोपडी आणि आश्रम पाहण्यासाठी चंपारणला भेट देतात...
हेही पहा : चंपारणचे 'ते' आंदोलन, ज्यामुळे गांधी झाले 'महात्मा'...