गडचिरोली : महाराष्ट्रदिनी कुरखेडा तालुक्यातील जांभुळखेडा-लेंडारी गावादरम्यान नक्षलवाद्यांनी भुसुरुंग स्फोट घडवून आणला. यात १५ जवान हुतात्मा झाले होते. या भूसुरुंगस्फोटाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रेणेने आपल्या हाती घेतला असून, एनआयएचे पथक गडचिरोलीत दाखल झाले आहे.
३० एप्रिलच्या रात्री नक्षल्यांनी कुरखेडा तालुक्यातील दादापूर (रामगड) येथील रस्त्याच्या कामावरील २७ वाहने व अन्य यंत्रसामग्री जाळली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १ मे रोजी जांभूळखेडा-लेंडारी गावादरम्यान असलेल्या नाल्याच्या पुलावर नक्षल्यांनी भूसुरुंगस्फोट घडविला. यात १५ पोलिस व एका खासगी वाहनचालक हुतात्मा झाले होते. या प्रकरणी अलिकडेच विधिमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित झाल्यानंतर गृहराज्यमंत्र्यांनी कुरखेड्याचे तत्कालीन उपविभागीय पोलिस अधीक्षक शैलेश काळे यांना निलंबित करण्याची घोषणा केली.
आतापर्यंत भूसुरुंगस्फोटाप्रकरणी आठ आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस या राजकीय पक्षाच्या माजी तालुकाध्यक्षाचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे.