मध्यप्रदेश (छिंदवाडा) - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि राजकीय व्यक्तीमत्व शत्रुघ्न सिन्हा यांनी अलिकडेच 'भाजप'ला रामराम ठोकुन काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे. शुक्रवारी (२६ एप्रिल) काँग्रेसच्या झालेल्या एका प्रचारार्थ सभेत बोलत असताना त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांनी देशासाठी कशाप्रकारे कार्य केले, यावर वक्तव्य केले.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमल नाथ यांचा मुलगा नकुल नाथ हे छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारार्थ सभेत ते बोलत होते. नकुल नाथ हे भाजपच्या नाथन शाह यांच्या विरोधात ही निवडणूक लढवत आहेत.
महात्मा गांधी, मोहम्मद जीना, सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू यांच्यासोबत अनेक काँग्रेस नेत्यांनी देशसेवेसाठी आणि देशाला स्वातंत्र्य मिळावे, यासाठी अथक प्रयत्न केले आहेत, असे शत्रुघ्न सिन्हा यावेळी म्हणाले.
देशाचा विकास, देशाचे उज्ज्वल भविष्य आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांचे महत्वपूर्ण योगदान आहे. त्यामुळेच मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आता काँग्रेस पक्ष कधीही सोडणार नाही, असेही ते म्हणाले.
किमान उत्पन्न योजनेबद्दल (न्युनतम आय योजना- NYAY) बोलताना ते म्हणाले, की या निवडणूकीमध्ये या याजनेमुळे पक्षाला फायदा ठरू शकतो. या योजनेद्वारे ज्यांचे उत्पन्न खूप कमी आहे, त्यांच्या खात्यात ७२००० रुपये टाकण्यात येणार असल्याची घोषणा काँग्रेसने केली आहे.