हैदराबाद (तेलंगाणा) - पेडपल्ली जिल्ह्यात कोळशाच्या खाणीत स्फोट झाला. या घटनेत चार कामगारांचा मृत्यू झाला असून तीन गंभीर जखमी झाले आहेत. राज्य सरकारच्या मालकीच्या सिंगरेनी कोलियरीज कंपनीत ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली.
एका खासगी कंत्राटदाराने या कामगारांना कामावर ठेवले होते. हे कामगार खाणीतील मोठे दगड फोडण्यासाठी डिटोनेटर्स ठेवत असताना स्फोट झाला आणि चार कामगार जागीच ठार झाले. तर तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, खाण सुरक्षेचे महानिरीक्षक या घटनेची चौकशी करतील, अशी माहिती एससीसीएलच्या एका वरिष्ठ अधिका-याने दिली.