हैदराबाद : तेलंगाणामधील एससीसीएल या कोळशाच्या खाणीत आज स्फोट झाला. यामध्ये चार मजूरांचा मृत्यू झाला असून, तीन मजूर गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. ही खाण पेड्डापल्ली जिल्ह्यामध्ये आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व कंत्राटी मजूर होते. मोठा खडक फोडण्यासाठी ते विस्फोटके लावत असताना, एका विस्फोटकाचा स्फोट होऊन हा अपघात घडला. यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. जखमी झालेल्या तीन मजूरांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. यावेळी बचावकार्य करणाऱ्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली.
प्रवीण, राकेश, अर्जय्या आणि राकेश अशी मृतांची नावे आहेत. तर शंकर, व्यंकटेश आणि भीमय्या अशी जखमींची नावे आहेत.
दरम्यान, खाण सुरक्षा महासंचलनालय या दुर्घटनेची चौकशी करणार असल्याची माहिती आणखी एका अधिकाऱ्याने दिली आहे.