रायपूर - राज्यातील १६ नक्षलवाद्यांनी दंतेवाडा पोलिसांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले आहे. यातील काही नक्षलवादी जहाल असून त्यांच्यावर रोख रकमेचे बक्षिसही होते. माओवाद्यांच्या विचारधारेत बदल झाल्याचे म्हणत त्यांनी शस्त्र खाली ठेवले आहे. या १६ जणांमध्ये ४ महिला नक्षलवाद्यांचाही सहभाग आहे.
नक्षली चळवळ सोडावी म्हणून पोलिसांकडून पुनर्वसन अभियानही राबविण्यात येत आहे. त्यामुळे चळवळ सोडून १६ जण मुख्य प्रवाहात येण्यास मदत झाली. यातील तिघांवर पोलिसांनी १ लाखांचे बक्षिस ठेवले होते. राजेश भास्कर(२६), सादे पारसिक उर्फ शहादेव(३०), भीम तीलम हे तिघे नक्षलवादी चळवळीत कमांडर पदी होते. त्यांच्यावर १ लाखांचे ईनाम ठेवण्यात आले होते. दंतेवाडाचे पोलीस अधिक्षक अभिषेक पल्लव यांच्या उपस्थितीत सर्वांनी आत्मसमर्पण केले.
सुरक्षा दलावर हल्ले आणि सरकारी संपत्तीचे नुकसान केल्याचा आरोप आत्मसमर्पण केलेल्यांपैकी तिघांवर आहे. तर इतर १३ जण चळवळीत काम करणारे होते. नक्षलवादाचा प्रचार करणे, गावोगावी पोस्टर लावणे आणि नक्षलवाद्यांना साधनसामुग्री पुरविण्याचे काम ते करत होते.
नक्षलवाद्यांच्या पोकळ विचारधारेमुळे नाराज झाल्याचे आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांनी म्हटले आहे. 'लोन वरातु' म्हणजे 'गावात माघारी या' या पोलिसांनी नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणासाठी राबविलेल्या अभियानामुळे प्रभावित झाल्याचे त्यांनी म्हटले. राज्य सरकारच्या पुनर्वसन योजनेनुसार त्यांना मदत आणि सहकार्य केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.