भीलवाडा - राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यातली विषारी दारू पिऊन सात जणांचा मृत्यू झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच भीलवाडामध्ये देखील चार जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. भीलवाडाच्या सारण येथील खेडा गावात विषारी दारू पिल्यामुळे चौघांचा मृत्यू झाला आहे. मृतामध्ये एका महिलेचाही समावेश आहे. तर अन्य पाच जणांची अवस्था गंभीर असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.
विषारी दारू पिऊन मृत्यू झाल्याने तेथील ग्रामीण भागात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेनंतर पोलीस प्रशासनदेखथील खडबडून जागे झाले आहे. मांडलगड पोलीस ठाण्याच्या हद्दीसह जिल्ह्यात बऱ्याचश्या ठिकाणी गावठी दारू सर्रासपणे विकली जात आहे. मात्र, या अवैध दारू विक्रीवर पोलीस आणि अबकारी विभागाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
अवैधा दारू धंद्याविरोधात कारवाईची मोहीम-
विषारी दारूमुळे चौघांचा मृत्यू झाल्याच्या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी शिवप्रसाद एम नकाते, जिल्हा पोलीस अधीक्षक विकास शर्मा यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच या प्रकरणात कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधित पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना दिले आहेत. अशा प्रकारे अवैध दारू विकणाऱ्याविरोधात मोहीम राबवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विकास शर्मा यांनी ईटीव्ही भारतला दिली.